विरोधी पक्षनेतेपदावर भाजप करणार दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 01:11 AM2020-02-28T01:11:14+5:302020-02-28T06:53:35+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई पालिकेतही भाजपची पकड सैल झाल्याचे दिसून येत होते
मुंबई : महानगरपालिकेच्या नगरसेवक गटाची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भारतीय जनता पार्टी महानगरपालिका गटनेते खासदार मनोज कोटक यांनी गुरुवारी घोषित केली. यात विरोधी पक्षनेतेपदी प्रभाग क्रमांक १०६ चे नगरसेवक प्रभाकर तुकाराम शिंदे यांची नियुक्ती केली. त्यामुळे लवकरच महापालिकेत भाजपकडून महापलिका विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई पालिकेतही भाजपची पकड सैल झाल्याचे दिसून येत होते. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस येथे विरोधी बाकावर आहे. त्याचवेळी दुसरा मोठा पक्ष असूनही पहारेकऱ्यांची भूमिका बजावण्यात भाजप अलीकडे कमी पडू लागल्याचे चित्र होते. मनोज कोटक खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भाजप अद्याप आक्रमक नेतृत्वाच्या शोधात होती. २०१७ ची निवडणूक स्वबळावर लढविणाºया भाजपने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला होता. मात्र राज्यातील सत्तेसाठी महापौरपदाच्या स्वप्नावर त्यांना पाणी सोडावे लागले. महापालिकेत दुसरा मोठा पक्ष असूनही भाजपने विरोधी बाकावर बसत पहारेकºयाची भूमिका स्वीकारली.
महानगरपालिका गटनेतेपदी भारतीय जनता पक्षाने विनोद मिश्रा यांची नियुक्ती केली. तर उपनेतेपदी उज्ज्वला मोडक व रिटा मकवाना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका गट मुख्य प्रतोदपदी सुनील यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक गटाची कामगिरी उंचावण्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी सक्षम विरोधी पक्षाची सकारात्मक भूमिका निभावण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, असे पक्षाकडून सांगण्यात आले.