Join us

ST कर्मचारी आंदोलनावर ठाम; आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोतांचा आझाद मैदानात मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 10:55 AM

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढायला तयार नाही अशी टीका पडळकर आणि खोत यांनी सरकारवर केली आहे.

मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. राज्यातील एसटी डेपोत कर्मचारी आंदोलन करत होते. मात्र आता या कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच केली आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब जमले आहे. या आंदोलनात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत सक्रीयपणे उतरले आहेत.

बुधवारी रात्रीचा मुक्काम पडळकर, सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी आझाद मैदानातच केला. कर्मचाऱ्यांसोबत जेवण आणि त्यानंतर तिथेच दोन्ही नेते झोपले होते. या आंदोलनावरुन सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर घणाघात केला आहे. ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीय. मराठीच्या नावावर मतांचा जोगवा मागणारी मंडळी त्यावर काही बोलायला तयार नाही. सरकारने मार्ग काढला नाही तर आंदोलन उग्र होईल. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अश्रू पुसण्याऐवजी बडतर्फाची कारवाई करताय. माणूस आत्महत्या करतोय कारण त्याला पुढे काही दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत तुम्हाला काहीच वाटत नाही का? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(BJP Gopichand Padalkar) यांनी सरकारला केला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर मार्ग काढायला तयार नाही. सरकारला मार्ग काढायचा नाही. मंत्र्यांकडे चर्चेला वेळ नाही. कर्मचाऱ्यांच्य मागण्या ऐकायला कुणीही अधिकारी येत नाही. चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकतो. परंतु सरकारला कर्मचाऱ्यांचे काही देणेघेणे नाही. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कर्मचारी का उचलत आहेत? हे सरकारला कळत नाही का? असं त्यांनी सांगितले.

तसेच परिवहन मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कुणीही पक्षाचा झेंडा घेऊन आलं नाही. कर्मचाऱ्यांकडे माणूस बघा. मराठी कर्मचारी आझाद मैदानात बसला आहे. पाकिस्तानी, चीनमधून माणसं येऊन बसली नाहीत. महाराष्ट्रात एकही एसटीचं चाक फिरणार नाही. सर्व समाजातील माणसं एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. मराठी माणूस हक्क मागतोय तो तुम्हाला देता येत नाही अशा शब्दात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :गोपीचंद पडळकरसदाभाउ खोत एसटी