मुंबई
बोरीवली विधानसभेतील भाजपामधील पेच अखेर सुटला आहे. माजी खासदार आणि भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. माझं म्हणणं पक्ष नेतृत्त्वापर्यंत पोहोचलं आहे. बोरीवली मतदारसंघात केलेले जाणारे प्रयोग आणि त्याबद्दलची नाराजी मी पक्ष श्रेष्ठींकडे मांडली आहे. त्यामुळे आता मी निवडणुकीतून माघार घेत आहे, असं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे.
बोरीवली मतदार संघातून गोपाळ शेट्टी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांच्या जागी भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं ते नाराज झाले होते. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज दाखल केला होता. गोपाळ शेट्टी दोन टर्म खासदार राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क देखील बोरीवली परिसरात दांडगा असल्यानं भाजपाला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही गोपाळ शेट्टींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यानंतर गोयल यांच्या कारमध्ये बसून शेट्टी सागर बंगल्यावर गेले. तेथे त्यांची समजूत काढण्यात फडणवीस यांना यश आल्याचं सुत्रांनी सांगितलं.गोपाळ शेट्टी २००४ आणि २००९ मध्ये बोरीवलीतून निवडून आले होते. मात्र २०१४ मध्ये त्यांना उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने विधानसभेला विनोद तावडे यांना उमेदवारी दिली होती. तसेच २०१९ ला सुनील राणे यांना विधानसभा, तर शेट्टी यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. २०२४ ला लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली होती. मी नाराज नमसून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि बोरीवली स्थानिक प्रतिनिधींना उमेदवारी मिळावी यासाठी अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे शेट्टी यांनी जाहिर केले होते.