Join us

ST Strike: “आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?”; गोपीचंद पडळकरांनी अनिल परबांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 5:55 PM

अनिल परब सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता भाजप आमदार गोपींचद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला असून, आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का, अशी विचारणा केली आहे. 

अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का, असा थेट सवालही केला. 

सरकारचे वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण

ठाकरे सरकारचे वेळकाढूपणा आणि चालढकल करण्याचे धोरण आहे. अनिल परब यांच्या वक्तव्यात काहीच बदल नाही. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी. हे कर्मचारी त्यांचेच आहेत ना. त्यांनी इथे यावे आणि या कर्मचाऱ्यांशी बोलावे. हे काय कुठले अतिरेकी इथे येऊन बसले आहेत का, त्यांचेच कर्मचारी आहेत. यांचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे. 

आझाद मैदानावर संप सुरू होऊन आज १३ वा दिवस 

आझाद मैदानावर संप सुरू होऊन १३ वा दिवस झालेत. २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात संप सुरू आहे. यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला हा एसटीचा विषय आहे. असे असूनही मुंबईत संप सुरू झाल्यानंतर १३ व्या दिवशी बैठक घेतली. संप झाल्यापासून २५ दिवस झालेत. यानंतरही निर्णय नाही. हे सरकार निर्णयक्षम नाही, यांच्यात एकमत नाही. एसटीत यांचा फार जीव गुंतलेला दिसतो, असा टोला पडळकर यांनी लगावला. ते टीव्ही९ शी बोलत होते. 

टॅग्स :एसटी संपगोपीचंद पडळकरअनिल परब