Join us

Kisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 1:57 PM

शेतकऱ्यांविषयी निर्णय घ्यायला सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही.

मुंबई: सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली नाही तर हा वणवा देशभरात पसरेल. मात्र, आता सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडले. सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आस्था उरलेली नाही, तेवढी संवेदनशीलता सरकारकडे उरलेली नाही. शेतकऱ्यांचा आजचा मोर्चा हा गेल्या अनेक महिन्यांच्या रागातून काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे दुखणे कोणातरी मांडायची गरज होती, लाल बावट्याने तो पुढाकार घेतला. मात्र, सरकारने आताही त्याची योग्य दखल घेतली नाही तर हा रागाचा हा वणवा देशभरात पसरेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला. सरकार आता शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहे. परंतु, सरकार इतकेच संवेदनशील असते तर उच्चस्तरीय मंत्रीगट नाशिकमध्येच गेला असता. यावरून शेतकरी इतकी पायपीट करून या मोर्चासाठी मुंबई आले, याची जराही फिकीर नसल्याचे स्पष्ट होते. आता केवळ आश्वासन देऊन या शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. सरकारने आता आपल्या निर्णयांना अंतिम रुप देण्याची गरज आहे. सरकारकडे त्यांची चूक सुधारण्याची शेवटची संधी आहे. शेतकऱ्यांविषयी निर्णय घ्यायला सरकारला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. एकीकडे सरकार उद्योगपतींच्या कर्जामुळे बँकिंग व्यवस्थेत निर्माण झालेला तोटा भरून काढण्यासाठी 80 हजार कोटींचे फेरभांडवलीकरण केले. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार 22 हजार कोटी देऊ शकत नाही. राज्यकर्त्यांनी अशीच बघ्याची भूमिका घेतली तर नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. त्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :किसान सभा लाँग मार्चमहाराष्ट्रशरद पवार