आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:16 PM2022-03-11T12:16:17+5:302022-03-11T12:18:38+5:30
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं.
मुंबई- गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर गोवा निवडणुकीसाठीचे प्रभारी असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबईत पक्षाच्यावतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेर भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केलं.
विजयाने नम्र व्हायचं, विजयाने मेहनत करायची आहे. अभी तो असली लडाई मुंबई में होगी. मुंबईला कोणत्या पक्षापासून वेगळं करायचं नाही. आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. आज विजय साजरा करा, उद्यापासून कामाला लागा. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल,असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Celebrations at @BJP4Maharashtra HQ for the grand victory of #BJP in #AssemblyElections2022 !#BJPAgain#BJPwinshttps://t.co/mcjIcT9CIK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 11, 2022
दरम्यान, भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीष महाजन यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रदेश कार्यालयात फडणवीसांचं स्वागत झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधानभवनातही फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भाजपानं जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी 'ये तो अभी झांकी है महाराष्ट्र बाकी है', अशा घोषणा भाजपा नेते देत असताना दिसले.