लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभेची ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष आहे. भाजपने लोकशाही, संविधान धोक्यात आणले असून, विविधतेला खुलेआमपणे छेद दिला आहे. तीन टप्प्यांतील मतदान झाले असून, दक्षिण भारतातच नाही, तर सर्वच राज्यांत हवा बदललेली दिसत आहे. ४ जूनला दिल्लीतून भाजपचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जात, धर्म, भाषा, प्रांत कोणताही असो, सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहोत, असे संविधानाने स्पष्ट केले आहे. परंतु भाजपचा विचार तसा नाही. भाजपने नागरिकांमध्ये धर्म आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे जे शब्द वापरत आहेत, ते शब्द आपण बंद घरातही वापरू शकत नाही. मोदींची भाषा राजकारण व देशासाठी योग्य नाही. भाजपचे राजकारण पाहता, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढाईत भाग घेतला आहे.
४ जूननंतर खऱ्या अर्थाने सर्व जाती-धर्माचा विकास करणारे व सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार येईल, असे थरूर यावेळी म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे, पण मोदींनी ते स्वीकारले नाही. यूपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.