Join us

मुंबईत भाजपचेच पालकमंत्री? शिंदेसेनेचाही पदावर दावा; महायुतीमध्ये नवीन राजकीय पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 13:57 IST

नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील दोन मंत्र्यांचा समावेश झाला आहे. दोघेही भाजपचे दिग्गज नेते आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर मुंबईला भाजपचेच पालकमंत्री मिळणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील दोन मंत्र्यांचा समावेश झाला आहे. दोघेही भाजपचे दिग्गज नेते आहेत. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शिंदेसेनेकडून मुंबई शहरचे पालकमंत्रीपद पुन्हा घेण्याचा प्रयत्न असला, तरी मुंबईतून शिंदेसेनेचा एकही आमदार मंत्रिमंडळात नाही.

राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात मुंबईतील भाजपचे मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार या दोन आमदारांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यापैकी मंगल प्रभात लोढा हे सातव्यांदा मलबार हिलमधून, तर आशिष शेलार हे तिसऱ्यांदा वांद्रे मतदारसंघातून आमदार झाले आहेत. या दोघांनीही यापूर्वी मंत्रिपद भूषविले आहे. आता ते पुन्हा मंत्रिपदाची धुरा सांभाळत असताना पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेंच

गत विधानसभेत मुंबई शहरचे पालकमंत्रीपद शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे होते, तर उपनगरचे पालकमंत्रीपद भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे होते. मुंबईमधील भाजपच्या दोन २ दिग्गज नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे या दोन्ही मंत्र्यांकडे मुंबई शहर आणि उपनगरचे पालकमंत्रीपद जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी भाजपची विधानसभेतील ताकद आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मुंबई मिळवण्याची असलेली महत्त्वाकांक्षा पाहता, या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे मिळावीत, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. मुंबईवरील आपली पकड सैल होऊ नये, यासाठी शिंदेसेनेकडूनही पालकमंत्री पदासाठी निश्चित प्रयत्न केला जातो आहे. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या शिंदेसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याला मुंबईचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी पक्षाकडून निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात कोणाची सरशी होईल, हेदेखील स्पष्ट होईल.

गेल्या मंत्रिमंडळामध्ये मुंबई शहरचे पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी अतिशय उत्तम काम पाहिले आहे. त्यामुळे मुंबई शहराच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा कायम आहे. मंत्रिमंडळात मुंबईचा चेहरा नसला तरी यावेळीसुद्धा आमचा कोणताही सक्षम मंत्री मुंबईच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारू शकतो. त्यामुळे या पदावर आमचा दावा कायम आहे आणि आम्ही तो मिळवणारच. - डॉ. राजू वाघमारे, सहमुख्य प्रवक्ते, शिंदेसेना 

टॅग्स :महायुतीभाजपाशिवसेना