Join us

गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढण्याचा ठराव भाजपाने मांडला होता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 8:37 AM

मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला.

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपातंर्गत नेतृत्वाविषयी नाराजी समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला एकनाथ खडसेंनी पक्षातील नेत्यांनी जाणूनबुजून काही नेत्यांना बाजूला ठेवले. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, मी स्वत: आम्हाला सोबत घेऊन निवडणुका लढविल्या असत्या तर किमान २५ जागा भाजपाच्या जास्त निवडून आल्या असत्या असा दावा करत खडसेंनी राज्यातील नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली. 

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुढे काय करायचं? कोणता मार्ग निवडायचा? असा मजकूर लिहल्याने पंकजा मुंडेही भाजपात नाराज असून त्या पक्षाला रामराम करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यानंतर आता भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपाने केला होता. मात्र आम्ही त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला असं त्यांनी सांगितले. 

प्रकाश शेंडगे यांनी २०१४ मध्ये भाजपाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत ओबीसी संघटनेची बांधणी सुरु केली. सध्या प्रकाश शेंडगे यांची शिवसेनेशी जवळीक वाढली आहे. त्यांनी म्हटलंय की, पंकजा मुंडे भाजपाच्या निशाण्यावर आहेत. जो प्रकार गोपीनाथ मुंडेसोबत भाजपाने केला तसचं पंकजा मुंडे यांच्यासोबत केला जात आहे. पंकजा मुंडे यांना परळीतून भाजपानेच पाडले. अण्णा डांगे, गोपीनाथ मुंडे, दौलत आहेर यासारखे अनेक नेते भाजपाने संपविले. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी वेळीच निर्णय घ्यावा असा सल्ला प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. 

दरम्यान, मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी भाजपाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलेलं आहे. भाजपा सोडत असल्याच्या अफवांमुळे व्यथित आहे. मी यासंदर्भात 12 डिसेंबर रोजी बोलणार आहे. तेव्हा मी काय ते स्पष्ट करेन, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

मला आता घर बदलायचं आहे. मी म्हटलं होतं 12 डिसेंबरला बोलेन, मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. आताच त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य होणार नाही. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. काही वृत्तपत्रांनी मी पक्ष सोडणार अश्या बातम्या लावल्या होत्या, त्यामुळे फारच दुखी झाले. मला कुठलं पद मिळू नये का, यासाठी हे सगळं चाललं तर नाही ना, असा मला प्रश्न पडतो आहे. मी खूपच व्यथित आहे. मी मुख्यमंत्री होणार अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या. मग जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री अशादेखील बातम्या छापल्या होत्या. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी सभा घेत होते. कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, कधीही कुठलं पद स्वीकारण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतनाची आणि आपल्या लोकांशी काय बोलायचं आहे, यासाठी वेळ नक्कीच दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.  

टॅग्स :पंकजा मुंडेगोपीनाथ मुंडेभाजपाप्रकाश शेंडगे