शिवसेनेच्या ‘दाढी’ला भाजपाने घातला हात
By admin | Published: January 29, 2017 03:27 AM2017-01-29T03:27:32+5:302017-01-29T03:27:32+5:30
आता यापुढे आपण ‘दाढीवाल्या बुवा’ला घाबरण्याची काहीच गरज नाही. भाजपा आता वयात आली असून आमच्याकडे अशी ‘बुवाबाजी’ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा
ठाणे : आता यापुढे आपण ‘दाढीवाल्या बुवा’ला घाबरण्याची काहीच गरज नाही. भाजपा आता वयात आली असून आमच्याकडे अशी ‘बुवाबाजी’ खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख न करता शनिवारी दिला. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेच्या दाढीलाच हात घातल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची ‘दाढी’ ही त्यांची ओळख आहे. भाजपाचे शहराध्यक्ष लेले यांनी शिवसेनेच्या दाढीला हात घातला, पण खुद्द लेले यांनीही दाढी वाढवलेली आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर हेही दाढीवाले आहेत. त्यामुळे आता युती तुटल्यावर कोण कुणाच्या दाढीला हात घालणार, याची चर्चा रंगू लागली आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांच्या जबड्यात हात घालून दात मोजण्याचा प्रयत्न केला होता.
युती तुटल्यानंतर ठाण्यात प्रथमच भाजपाने ‘विजयी संकल्प मेळाव्या’च्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. गेल्या २५ वर्षांत झालेले भ्रष्टाचार, शिवसेनेचा श्रेय घेण्याचा खोटारडेपणा यावर नेत्यांनी तोंडसुख घेतले. माजलेल्या बैलाला वेसण घालण्याची वेळ आल्याचे सांगत येत्या निवडणुकीत भाजपाला ६६ च्यावर जागांवर यश मिळणार असून पुढील महापौर हा भाजपाचाच असेल, असा दावा केला.
मेळाव्यात आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, विभागीय अध्यक्ष खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले आदी उपस्थित होते. लेले यांनी शिवसेनेच्या माजलेल्या बैलाला वेसण घालण्याची वेळ आल्याची टीका केली. युती तोडल्याबद्दल लेले यांनी मित्रपक्षाला जाहीर धन्यवाद दिले. ठाण्यातील सीआरझेडचे मुद्दे, मेट्रो, झोपडपट्टी पुनर्विकास ही व इतर कामे भाजपानेच केली. परंतु, त्याचे श्रेय घेण्याचे काम मात्र शिवसेना करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ठाण्यातील टक्केवारीच्या राजकारणाला आता वठणीवर आणण्याची वेळ आली असून भ्रष्टाचारमुक्त ठाणे आणि पारदर्शक कारभार करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मतदात्यापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे, असे आ. केळकर म्हणाले. दिव्यातील न झालेल्या स्मशानभूमीचा पैसा कुठे गेला, रस्त्याच्या कामाचा निधी कुठे गेला, असे सवाल केळकर यांनी करून शिवसेनेच्या भ्रष्टाचारी मंडळींना घरी बसवण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
महापौर भाजपाचाच- रवींद्र चव्हाण
केंद्रातील मोदी सरकारचे काम, राज्यातील फडणवीस सरकारचे काम हे सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याची वेळ आली असून त्यासाठी आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता आले पाहिजे, असे मत आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
भ्रष्टाचार, टक्केवारी यातून बाहेर पडून एक पारदर्शक कारभार ठाण्यात करायचा असून ठाण्यात भाजपाचे ६६ हून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि महापालिकेत भाजपाचाच महापौर होईल, असा दावाही त्यांनी केला.
ठाण्याचा विकास
झाला पाहिजे
आता नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही.
आता खऱ्या अर्थाने मेहनतीची गरज आहे. ठाण्यात
परिवर्तन झालेच पाहिजे,
‘ठाणे तिथे काय उणे’ म्हणण्याची वेळ आली
असून त्यासाठी भाजपाला साथ देऊन ठाण्याचा
विकास केला पाहिजे, असे
मत खासदार कपिल पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.
शिवसेनेला सुनावले
‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते है’, असे माधवी
नाईक म्हणाल्या. केंद्रात, राज्यात आणि आता सर्वच ठिकाणी भाजपा हा सगळ्यांचा बाप असून प्रत्येकाला आता हे समजावण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी शिवसेनेला सुनावले.
ट्रम्प हे मोदींचे
नाणे चालवतात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प हे मोदींचे नाणे चालवतात, तर मग ठाण्यात मोदी आणि देवेंद्र यांचे नाणे का चालणार नाही, असा सवाल उपस्थित करीत ठाण्याचा पुढील महापौर हा भाजपाचाच असेल, असा दावा संपर्कमंत्री रवींद्र भुसारी यांनी केला.