"स्वत:ला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 01:19 PM2021-03-23T13:19:56+5:302021-03-23T13:20:30+5:30
भाजपाने ट्विटरद्वारे पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधाला आहे.
मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे प्रत्येकाच्याच निशाणावर दिसत आहेत. एवढेच नाही, तर याच मुद्द्यावर देशाच्या संसदेतही जबरदस्त गदारोळ पाहायला मिळाला.
परमबीर सिंह यांच्या दाव्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोपांनंतर विरोधक काहीसे आक्रमक झाले आहेत. भाजपाकडून राज्यभरात विविध ठिकाणी राज्य सरकारच्या आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर भाजपाने ट्विटरद्वारे पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा साधाला आहे.
भाजपा महाराष्ट्र या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे म्हणाले की, केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यांवर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, असं भाजपाने ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
केवळ खुर्चीच्या लालसेपोटी स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री @OfficeofUT हे आता @PawarSpeaks यांच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत. एकाच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना वेगवेगळे न्याय आणि नियम आहेत का? ज्याच्यावर आरोप झाले आहेत, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. #ResignanilDeshmukhpic.twitter.com/mKH8n77P1B
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन, परमबीर सिंगांनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप चुकूचे असल्याचे म्हणत, परमबीर सिंग सांगत आहेत त्या काळात देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते, असे म्हटले होते. मात्र, यानंतर फडणवीस यांनी एक ट्विट करून पवारांचे दाव्यांची पोलखोल केली होती.
अनिल देशमुखांनी व्हिडिओ जारी करत दिलं स्पष्टीकरण-
यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, की " गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. काही ठिकाणी माध्यमांतूनही चुकीच्या बातम्या येत आहेत. यामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. नागपूरमध्ये असतानाच ५ फेब्रुवारीला मला कोरोनाची लागण झाली. यानंतर मी तेथील रुग्णालयात भरती होतो. १५ फेब्रुवारीला मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर होम क्वारंटाइनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो. यासंपूर्ण काळात मी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमाने बैठकांमध्ये भाग घेत होतो." या शिवाय, गृह मंत्री म्हणून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आपण संपूर्ण राज्याचा दौरा करत होतो, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते, अनेकांना भेटले -
काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले. यामुळे ते एक्सपोझ झाले आहेत. मला वाटते, की देशमूख हे १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद https://t.co/nfQUDXgSKE
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2021
शरद पवार काय म्हणाले-
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यांना १५ फेब्रुवारीला रुग्णालयातून सुटी मिळाली; त्यानंतर १५ दिवस ते घरीच विलगीकरणात होते. देशमुख रुग्णालयात भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत त्यांना घरीच आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला होता. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यता नाही.