पंकजा मुंडेंना मोठ्या जबाबदारीचं 'आश्वासन'; नव्या कार्यकारणीतही झालं नाही खडसे-तावडेंचं पुनर्वसन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 05:00 PM2020-07-03T17:00:10+5:302020-07-03T17:43:16+5:30
पंकडा मुंडे यांना भाजपा कार्यकारिणीत महत्वाची भूमिका देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
मुंबई: भाजपाने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र भाजपाच्या कार्यकारिणीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आलं आहे. पंकडा मुंडे यांना भाजपा कार्यकारिणीत महत्वाची भूमिका देतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना स्थान न दिल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. परंतु पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारिणीत जबाबदारी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल. तसेच भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे आणि भाजापाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे जबाबदारी दिली, असं नाही, अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील असणार आहे. महामंत्री म्हणून सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक यांनी वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्ष पदी राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेचा, प्रतोद माधुरी मिसाळ उमा ताई खापरे यांनी निवड करण्यात आली आहे.
भाजापाच्या सरचिटणीस पदी सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेची संधी हुकलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील स्थान देण्यात आलं आहे. पंरतु भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.