सेनेची रणनीती भाजपाने उलटवली

By Admin | Published: October 22, 2014 03:08 AM2014-10-22T03:08:47+5:302014-10-22T03:08:47+5:30

प्रत्यक्षात झाले उलटेच! शिवसेनेचे दोन खंदे शिलेदार सुभाष देसाई आणि विनोद घोसाळकर हेच चीतपट झाले.

The BJP has changed the strategy of the party | सेनेची रणनीती भाजपाने उलटवली

सेनेची रणनीती भाजपाने उलटवली

googlenewsNext

मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती फुटली आणि सगळ्यांचीच त्रेधातिरपीट झाली. महायुती फोडण्यात चाणक्याची भूमिका बजावणारे एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीत चीतपट करण्याचा निर्धार शिवसेनेने केला होता. पण प्रत्यक्षात झाले उलटेच! शिवसेनेचे दोन खंदे शिलेदार सुभाष देसाई आणि विनोद घोसाळकर हेच चीतपट झाले.
ही विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करून ज्या नेत्यांनी महायुती तोडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली त्यांच्याबद्दल सामान्य शिवसैनिकांच्या मनात कमालीची चीड निर्माण झाली होती. विलेपार्ले हा मोक्याचा असला तरीदेखील बेभरवशाचा मतदारसंघ असल्याने विनोद तावडे यांनी खुबीने बोरीवलीची जागा पटकावली. तेव्हा त्यांना घेरण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली. बोरीवलीतील एक मोठे प्रस्थ असलेल्या उत्तम अग्रवाल यांना उमेदवारी देऊन तावडेंना पाडण्याचे ठरविले. तावडे यांच्यासाठी बोरीवली मतदारसंघ नवा होता. बाहेरचा उमेदवार लादल्याने भाजपामध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. त्याचा फायदा घेत तावडेंना पाडायचे असा चंग बांधला. पण तावडेंनी कमी काळात मतदारसंघ बांधत विजय खेचून आणला. तब्बल ७९ हजारांच्या मताधिक्याने ते निवडून आले.
वांद्रे मतदारसंघातही विलास चावरी या कट्टर शिवसैनिकाला मैदानात उतरवून सरकारविरोधी लाटेत मतांचे विभाजन होणार याचे गणित आखले. त्यात मनसे उमेदवाराचीही भर पडली. बाबा सिद्दिकी यांचा जनसंपर्क आणि मतदारसंघातील पोहोच त्यांना तारून नेईल, अशी शक्यता निर्माण झाली. पण गेल्या निवडणुकीचा अनुभव पाठीशी असलेल्या आशिष शेलार यांनी पूर्ण शक्ती येथे लावली. कितीही रणनीती आखली तरीदेखील एकही लूप होल सोडायचा नाही, असा चंगच शेलार यांनी बांधला होता. तब्बल २६ हजारांनी शेलार विधानसभेवर पोहोचले.
तर दुसरीकडे बेसावध राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना पराभवाचा सामना करावा लागला. गोरेगावातील जवाहर नगर, बांगूर नगर, सुंदर नगर या गुजरातीबहुल भागांमध्ये देसाई यांनी अनेक विकासकामे केली. हे भाग कधीही दगा देणार नाहीत, हे देसाई जाणून होते. पण देसाई यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी रणनीती आखताना काही गोष्टी गृहीत धरल्या आणि शेवटी दगाफटका झालाच. देसाई यांना झोपडपट्टी भागातून चांगले मतदान झाले आहे. मात्र भाजपाने देसाई यांना पाडण्याचा चंग बांधला आणि तो तडीसही नेला. भाजपाच्या चाणक्यांना पाडण्याचे मनसुबे आखणाऱ्यांना अस्मान दाखवायचे, असे भाजपाने ठरवले होते, ते त्यांनी सत्यात उतरवून दाखवले. दहिसरमधील दिग्गज शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांच्याविरुद्ध स्त्रीशक्ती एकवटली होती. घोसाळकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. एका प्रकरणात त्यांची आधीच खूप बदनामी झाली होती. तरीदेखील शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच उमेदवारी दिली, ती निवडून येण्याच्या क्षमतेमुळेच. पण मनीषा चौधरी यांनी घोसाळकरांना तब्बल ३८ हजार मतांनी पराभूत केले. घोसाळकरांच्या रसाळह्णवाणीह्णमुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांनीही भाजपाला दहिसरमध्ये मदत केली. भाजपानेही ती सढळ हस्ते स्वीकारली. (प्रतिनिधी)

Web Title: The BJP has changed the strategy of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.