मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील एक कथित फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन आता राजकारण तापलं आहे. आधी राऊत यांनी फोटो ट्विट करत जुगार खेळल्याचे आरोप केले, तर दुसरीकडे आता भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंकडे जुगारासाठी करोडो रुपये आले कुठून? चौकशी करा, काँग्रेसने केली मागणी
आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोत आमदार बावनकुळे एका कसिनोत बसल्याचे दिसत आहेत. या ट्विटमध्ये राऊत यांनी लिहिले की, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…” या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. आता भाजपनेही आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपने आता आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोत आदित्य ठाकरे यांच्या हातात ग्लास आहे. भाजपने ट्विटमध्ये लिहिले की, "आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ , आदित्य च्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की? "
संजय राऊत यांचं ट्विट काय होतं?
खासदार संजय राऊत यांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला. या ट्विटमध्ये लिहिले की, 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?, असा टोला या ट्विटमध्ये दिला. या ट्विटला भाजपच्या नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.