मुंबई : कोरोनाच्या लाटेचा दुसरा फेरा राज्याच्या डोक्यावर घोंगावत असून, राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २५,८३३ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत, तर मुंबईने दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईत ३,०६२ एवढे नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील गेल्या सहा दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या एक लाख नऊ हजार १७८ एवढी झाली आहे. राज्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाख ७७ हजार ५६० इतकी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने पुन्हा वाढली आहेत.
राज्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दररोज रुग्णसंख्या वाढू लागली. काही ठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असले तरी त्यामुळे संपर्कातून पसरणाऱ्या कोरोनाला अटकाव करणे शक्य झालेले नाही. शुक्रवारी राज्यात १४,४०० रुग्णांना घरी सोडण्यात आले. आता राज्यात ८ लाख ६७ हजार रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर ७,८४८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्याचा मृत्युदर २.२० एवढा आहे. शुक्रवारी एकूण ७० मृत्यूंची नोंद झाली आहे.
देशात शुक्रवारी ३५,८७० नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. देशामधून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजपाने ट्विट करुन म्हटले की, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय, असं म्हणत ''ठाकरे सरकराची पोरं हुश्शार...'', असा टोला देखील लगावण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ-
गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १२४ दिवसांवर आला आहे, तर सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ०.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
४८ तासांमध्ये सज्ज व्हा-
जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्णालयांमधील खाटांची संख्या अधिक आहे. पालिका रुग्णालयांमध्येदेखील ही क्षमता वाढविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर सरकारी रुग्णालयांप्रमाणे सर्व खासगी रुग्णालयांनी पुन्हा कोविड खाटांची संख्या येत्या ४८ तासांमध्ये वाढवावी, अशी सूचना मुंबई पालिका आयुक्तांनी केली आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्यात, त्यासाठी साधनसामग्री व मनुष्यबळ आदी सर्व व्यवस्था युद्धपातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती रुग्णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.