Join us

राज्याच्या इतिहासात कधीही नाही घडलं ते भाजपाने 'करुन दाखवले' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 9:09 AM

कालांतराने शिवसेनेने भाजपाशी हातमिळवणी करत राज्यातील सत्तेत सहभागी होण्यास तयार झाली. राज्यात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्तेत सहभागी झाला होता.

मुंबई - मागील अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. याआधीही शिवसेनेचे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे भाजपा सरकारच्या या कार्यकाळात पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासात दोन विरोधी पक्षनेते मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळत आहे. 

काँग्रेसच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करत महसूल मंत्रीपद दिलं होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षाला 123 जागांवर तर शिवसेनेला 63 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 82 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने दावा करत एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते दिलं होतं. मात्र कालांतराने शिवसेनेने भाजपाशी हातमिळवणी करत राज्यातील सत्तेत सहभागी होण्यास तयार झाली. राज्यात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्तेत सहभागी झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही किमया करुन दाखविली होती. 

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. अशातच विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी फारकत घेत भाजपाशी जवळीक साधली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये नाराज झाले. डॉ. सुजय विखेंना तिकीट मिळावं यासाठी राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करत होते मात्र तिकीट न मिळाल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखेंच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला. विखे पाटील यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला नसला तरी आज होणाऱ्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एकाच टर्ममधील दोन विरोधी पक्षनेते गळाला लावण्याची कामगिरी भाजपाने चोख पार पाडली आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेनाराधाकृष्ण विखे पाटीलएकनाथ शिंदे