नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान असं यश मिळवल्यानं विरोधकांचा पुरता भ्रमनिराश झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच विरोधकांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु निवडणूक आयोगानं त्याला केराची टोपली दाखवली. आता निवडणुकीच्या निकालानंतरही विरोधक हा मोदींचा विजय नव्हे, तर ईव्हीएमचा विजय असल्याचं सांगत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात प्रश्नचिन्ह विचारले होते. ईव्हीएम मशिनमध्ये कुठलंही बटण दाबल्यास भाजपाला मत जात असल्याचाही त्यांनी आरोप केला होता.आता शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर पवार यांनी ट्विटरवर पोस्ट टाकत ईव्हीएम मशिनबाबत पुन्हा एकदा संशयाचं वातावरण निर्माण केलं आहे. शरद पवार ट्विटमध्ये म्हणतात, ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपाची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती.
लोकसभा जिंकायची होती म्हणून भाजपानं तीन राज्यांत पराभव पत्करला– शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 8:16 PM