Join us

भाजपाची सदस्यसंख्या चार कोटींवर

By admin | Published: February 01, 2015 2:00 AM

सध्या देशात भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत पक्षाने साडेचार कोटी सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे़ यात उत्तर प्रदेशमध्ये १ कोटी इतकी नोंद झाली आहे.

ठाणे : सध्या देशात भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. आतापर्यंत पक्षाने साडेचार कोटी सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे़ यात उत्तर प्रदेशमध्ये १ कोटी इतकी नोंद झाली आहे. कर्नाटक, आसाममध्येही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाख सदस्यांची नोंद झाली असून, राज्यात १ कोटींचे लक्ष्य गाठायचे असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी दिली़ ठाण्यातील पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेच्या आरंभावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़भाजपाला जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनविण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले़ आजघडीला चीनमधील कम्युनिस्ट पार्टीची सर्वाधिक ८ कोटी इतकी सदस्य संख्या आहे. भारतीय जनता पार्टीला ही संख्या पार करून जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष बनायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. पालघर जिल्हा परिषदेच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो स्थानिक नेते घेतील. मी त्याबाबत बोलणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत अण्णा हजारे यांच्याबाबतीत जो प्रकार घडला आहे, त्यासंदर्भात काही माहिती नाही़ त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.‘सामना’विषयी बोलणे टाळले‘सामना’मधून सरकारवर जी टीका होत आहे, त्याबाबत सहस्रबुद्धे यांना विचारले असता ते म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या काळातही टीका झाली होती. त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. (प्रतिनिधी)