Sachin Vaze: 'मी तर यातला छोटासा हिस्सा, शिवसेना...'; वाझेंनी NIAला कबुली दिल्याचा भाजपाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 09:12 AM2021-03-15T09:12:31+5:302021-03-15T09:13:40+5:30
भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी (sachin Vaze) चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25)
सचिन वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे.
भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सचिन वाझे यांना १० दिवसांची NIA कोठडी मिळाली.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 14, 2021
पोलिसांची इनोव्हा तिथे कशी?
अटक झालेले वाझेच या प्रकरणाचे तपास अधिकारी कसे?
संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालताहेत?
वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली?
ठाकरे सरकार, हे सगळं स्पष्ट होईल, हिरेन कुटुंबाला न्याय मिळेल! pic.twitter.com/tYjvtc0Qi2
अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त सल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. त्यासाठी त्यांच्या मोबाइलचे सीडीआर तपासले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझेंचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे एनआयए तपासातून आणखी कोणत्या धक्कादायक बाबी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sachin Vaze: सचिन वाझेंच निलंबन होणार; एनआयए कोठडी सुनावल्याने कारवाई अटळ https://t.co/aRhSE6Izzx
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021
‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.
हत्येचाही गुन्हा दाखल करणार
सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले.
गुन्ह्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर
सचिन वाझे यांनी गंभीर गुन्ह्याच्या कामात पोलीस वाहने, आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.
सचिन वाझेंवरील दाखल कलमे -
कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणे
कलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे
कलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती
कलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे
कलम १२० ब : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्यंत्रात सहभाग घेणे
स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचा यात समावेश आहे.