मुंबई : केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरलं आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आपलं हे अपयश लपविण्यासाठीच भाजपा धार्मिक कट्टरतेच राजकारण करत असल्याची घणाघाती टीका मुंबई शहराचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज त्यांच्या बंगल्यावर झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
दिवसागणिक हजारोंच्या संख्येने तरुण - तरुणी बेरोजगार होत आहेत. उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. लघु उद्योजकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. नेपाळ, बांग्लादेशसारखे देश आपल्या पुढे जाऊ लागले आहेत, या सर्व मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच भारतीय जनता पार्टीला कधी तिन तलाक, लव्ह जिहाद तर कधी छठ पूजा व मंदिरं उघडण्यासारख्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो आहे अशी टीका त्यांनी केली.
कुठलाही देश शेजारील देशांबरोबर शत्रूत्वाचे संबंध ठेऊन स्वत :ची प्रगती करुन घेऊ शकत नाही. आज भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर संबंध विकोपास गेलेले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांचा अभ्यास करण्याची व त्यातून बोध घेण्याची गरज असल्याचा सल्ला शेख यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
भाजपच्या आंदोलनांपुढे सरकार झुकणार नाही
अस्लम शेख यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टीच्या राजकीय स्वार्थाने प्रेरीत आंदोलनांच्या दबावाखाली येऊन घाईघाईत कोणताही निर्णय महाविकास आघाडीचे सरकार घेणार नाही. दिल्ली सरकारने केलेल्या चुका या भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनांच्या मागण्या आहेत. दिल्लीमध्ये माॅल्स, मंदिरे, सिनेमागृह खोलण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या निर्णयाचं पर्यावसान कोरोनाचे रुग्ण वाढण्यात झालं. या चुका महाविकास आघाडीचे सरकार करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत उभ्या राहिलेल्या कोरोना काळजी केंद्रांचं कौतूक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर) सारख्या संस्थेने केले. कोरोना विरोधातल्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. येणाऱ्या काळात देखील ही कोरोना काळजी केंद्र चालू ठेवली जातील असे त्यांनी सांगितले.
मुंबई- दिल्ली विमानसेवा, ट्रेन सेवा सोमवारपासून बंद करणार का ..? या प्रश्नाचं उत्तर देताना अस्लम शेख म्हणाले की, गरज भासल्यास दिल्लीतील परिस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घेतला जाईल. दुबईच्या धर्तीवर प्रवाशांसाठी आरटी पीसीआर टेस्ट सक्तीची करण्याचाही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.