स्वत:चे अपयश लपवण्यासाठीच भाजपला धर्म व लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो- अस्लम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:19 AM2020-11-22T09:19:04+5:302020-11-22T09:19:04+5:30
मुंबई : केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले ...
मुंबई : केंद्र सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आपले हे अपयश लपविण्यासाठीच भाजप धार्मिक कट्टरतेचे राजकारण करत असल्याची घणाघाती टीका मुंबई शहराचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज त्यांच्या बंगल्यावर झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली.
दिवसागणिक हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी बेरोजगार होत आहेत. उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. लघु उद्योजकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. नेपाळ, बांगलादेशसारखे देश आपल्या पुढे जाऊ लागले आहेत, या सर्व मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच भारतीय जनता पक्षाला कधी तीन तलाक, लव्ह जिहाद तर कधी छठ पूजा व मंदिरे उघडण्यासारख्या मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपच्या आंदोलनांपुढे सरकार झुकणार नाही
अस्लम शेख यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थाने प्रेरित आंदोलनांच्या दबावाखाली येऊन घाईघाईत कोणताही निर्णय महाविकास आघाडीचे सरकार घेणार नाही. दिल्ली सरकारने केलेल्या चुका या भारतीय जनता पक्षाच्या आंदोलकांच्या मागण्या आहेत. दिल्लीमध्ये माॅल्स, मंदिरे, सिनेमागृह खोलण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या निर्णयाचे पर्यवसान कोरोनाचे रुग्ण वाढण्यात झाले. या चुका महाविकास आघाडीचे सरकार करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत उभ्या राहिलेल्या कोरोना काळजी केंद्रांचे कौतुक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर)सारख्या संस्थेने केले. कोरोनाविरोधातल्या धारावी पॅटर्नची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. येणाऱ्या काळातही ही कोरोना काळजी केंद्रे चालू ठेवली जातील, असे त्यांनी सांगितले.
---------------------------------------------