मुंबई : विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्याचा नकार देणाऱ्या भाजपाने विरोधकांची भूमिका वठविण्यास मात्र सुरुवात केली आहे. स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीतच भाजपाने ‘२४ तास पाणीपुरवठा’ या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर निशाणा साधला. वांद्रे व मुलुंड येथील प्रयोगाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. आपला जावईच असल्यासारखी वागणूक ठेकेदारांना मिळत आहे. तीन वर्षांत ३० कोटी पाण्यात घातले तरी २४ तास पाणीपुरवठा कधी होणार याची शाश्वती नाही, असा अप्रत्यक्ष टोलाच भाजपाने सेनेला लगावला.मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले आहे. या प्रकल्पाचा प्रयोग मुलुंड व वांद्रे या दोन विभागांतून सुरू झाला. या कामाचे कंत्राट सुयज या कंपनीला देण्यात आले. आतापर्यंत या कामासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र अद्यापही २४ तास पाणीपुरवठा हे दिवास्वप्नच आहे. गेली तीन वर्षे हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे उर्वरित २३ विभागांमध्ये काम कधी होणार? असा जाब भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला आज विचारला.ठेकेदाराला प्रशासन आपल्या जावयाप्रमाणे वागवत आहे. या ठिकाणी आम्ही भेट दिली तर ठेकेदाराने आम्हाला जुमानले नाही. ‘२४ तास पाणीपुरवठा’ ही घोषणा कागदावरच आहे, या शब्दांत कोटक यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. तर खर्च झालेले ३० कोटी रुपये वाया जाण्याची भीती समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी व्यक्त केली. वांद्रे येथे दूषित पाणीपुरवठा होतो तरी प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केला. (प्रतिनिधी)
भाजपाकडून सेनेची कोंडी सुरू
By admin | Published: March 24, 2017 1:28 AM