Join us

राज ठाकरेंना भाजपाची गुगली, त्यांचंच व्यंगचित्र वापरून उडवली दांडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 8:07 PM

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपाकडून प्रत्युत्तर

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या भेटीगाठींवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरेंना भाजपानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात थोडे बदल करत भाजपानं राज ठाकरेंवर शरसंधान साधलं आहे. अमित शहा एकापाठोपाठ एक राज्य खिशात घालत असताना राज ठाकरेंचा पक्ष नेमका कुठे आहे, असा खोचक सवाल भाजपानं व्यंगचित्रातून उपस्थित केला आहे.

भाजपाच्या व्यंगचित्रात अमित शहांच्या हातात एक भलीमोठी यादी दाखवण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल अशा राज्यांचा उल्लेख आहे. भाजपानं शहांच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या राज्यांचा उल्लेख यादीत आहे. तर अमित शहांच्या समोर राज दीन अवस्थेत उभे आहेत. 'तुम्ही तर एवढे राज्य जिंकले, माझ्याकडे जे होते ते पण पळून गेले,' असं राज ठाकरे बोलताना दिसत आहेत. अमित शहांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची बकेट लिस्ट असं शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आलं आहे. या व्यंगचित्राखाली 'बारामतीचा नवीन पोपट' असं लिहिण्यात आलं आहे.  

भाजपा अध्यक्ष अमित शहा सध्या देशभरातील प्रख्यात व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून देशातील 1 लाख लोकांच्या भेटी घेण्याचा शहांचा संकल्प आहे. शहांच्या याच भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून काही वेळापूर्वीच जोरदार निशाणा साधला. ज्या व्यक्तींना भेटायचं आहे, त्यांची एक भलीमोठी यादी अमित शहांच्या हातात आहे, असं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं. 'बकेट लिस्ट?', अशा शब्दांमध्ये राज यांनी ठाकरी शैलीत शहांवर शरसंधान साधलं आहे. शहा बकेट लिस्ट पाहण्यात व्यस्त असल्यानं भाजपा कार्यकर्त्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केला. 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून सध्या अमित शहा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. आज अमित शहांनी मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. याच भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र रेखाटलं. यामध्ये अमित शहांच्या हातात एक भलीमोठी यादी देण्यात आली आहे. यामध्ये माधुरी, लतादीदी, कपिल देव, उद्धव, मिल्खासिंग यांची नावं आहेत. ही यादी इतकी मोठी आहे की त्यामुळे समोर उभा असलेला भाजपाचा कार्यकर्ता शहांना दिसतही नाही, असं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. प्रख्यात लोकांच्या भेटी घेणाऱ्या अमित शहांना भेटीगाठीतून भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी वेळ नाही, असं राज यांनी यातून दाखवलं होतं.  

टॅग्स :राज ठाकरेअमित शाह