BJP ( Marathi News ): मुंबई- येणाऱ्या काही दिवसातच देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप विरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी सुरू केली आहे. इंडिया आघाडीची जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपही ॲक्शनमोडमध्ये आली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील मंत्री गिरीष महाजन, चंद्रकांतदादा पाटील, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन काही दिवसातच होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
“राम मंदिर सर्व हिंदूंचे, पण भाजपा धर्माचे राजकारण करतेय”; रेवंथ रेड्डींची दावोसमधून टीका
आज सकाळी साडे अकरा वाजता ही बैठक होणार आहे. भाजप दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार आहे. पाच राज्यातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीतही भाजपने दिग्गज नेत्यांनी उतरवले होते, हेच सूत्र भाजप लोकसभेलाही वापरणार असणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप ७० चा फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत
भाजपा आपल्याच मातब्बर नेत्यांना धक्का देण्याची तयारी करत आहे. भाजपा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी तरुण आणि महिला नेत्यांवर डाव लावू शकते. सुत्रांनुसार भाजपा ७० वर्षांवरील नेत्यांना घरी बसविण्याची तयारी करत आहे. जर असे झाले तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांपासून ते व्ही के सिंहांपर्यंत ५६ नेते लोकसभेच्या रेसमधून बाहेर पडणार आहेत.
भाजपा अधिकाधिक जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. २०१९ मध्ये ४३७ जागांवर भाजपान निवडणूक लढविली होती. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते. १५० ते १६० जागांवर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.