मुंबई - कोरोना काळात दोन वर्ष गणेशोत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांवर आलेल्या निर्बंधामुळे मराठी मनावर मरगळ आली होती. परंतु यावर्षी मात्र सर्व सण जोषात साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याने गणेश भक्त आणि गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा अशी मागणी ही सातत्याने केली जात आहे. असं असताना आता अपघातग्रस्त गोविंदासाठी भाजपाचा पुढाकार घेतला असून १० लाखांचा विमा काढण्याचं जाहीर केलं आहे.
भाजपाचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "दहीहंडीत दरवर्षी अनेक गोविंदा आपले अवयव गमवतात, त्यांची काळजी आपणच केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी १० लाखांचा वीमा देण्याचं मुंबई भाजपाने जाहीर केलं आहे. गोविंदांनी यात सहभाग घ्यावा. आता भीती नाही कशाची, भाजपा तुमच्या पाठिशी... आता होऊन जाऊ द्या गोविंदा रे गोपाळा" असं नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच यासोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
वसई-विरार महापालिकेने त्यांच्या हद्दीतील गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरवला आहे. त्या धर्तीवर, ठाणे महापालिकनेही शहरातील गोविंदा पथकाचा अपघात विमा उतरवावा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, मुंबई,नवी मुंबई महापालिकासोबत राज्यातील सर्व बड्या महापालिकानी पुढाकार घेऊन अशा प्रकारे गोविंदा पथकांचा विमा उतरवावा असेही त्यांनी सांगितले. यंदा दहीहंडी उत्सवाकरीता वसई विरार महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने गोविंदा सुखावले आहेत.
वसई विरार महापालिकेने आपल्या मनपा क्षेत्रातील सर्व गोविंदांचा अपघाती विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात देखील अनेक गोविंदा पथके आहेत, याच धर्तीवर ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत गोविंदा पथकातील बाळगोपाळांचे विमा उतरवावेत, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. किंबहुना, वसई विरारच का, ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच महापालिकानी गोविंदाचे विमे उतरविले पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली. या आधी जायबंदी झालेल्या गोविंदाच्या औषधोपचाराचा सर्व खर्च शासनाने करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. दही हंडी हा सण आता महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले असल्याने पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत या सणात खारीचा वाटा उचलावे असेही ते म्हणाले.