Join us

ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही; राज्यात ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत,शिंदे-पवारांचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:05 AM

सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या घटक पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. राज्यातील दक्षिण मुंबई, शिरूर, मावळ, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जागांवर भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून दावा करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. 

भाजपा राज्यात लोकसभेच्या ३० ते ३२ जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ८ ते १० जागा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे लोकसभेसाठी भाजपा आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यात सध्या ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये अमित शाह महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

ठाकरे गटाचे अरविंद सावंत सध्या दक्षिण मुंबईतून खासदार आहेत. या जागेवरून राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवावी, अशी भाजपाची इच्छा आहे, तर शिवसेनेने (शिंदे) मिलिंद देवरा यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे वृत्त आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून समीकरणे बदलली आहेत. मिलिंद देवरा यांनी नुकतेच काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. दक्षिण मुंबईतून ते दोनदा खासदारही राहिले आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे याच महिन्यात मिलिंद देवरा यांची राज्यसभेवर निवड झाली आहे.

महाविकास आघाडीचं ठरलं-

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र २०-१८-१० असे ठरले आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा सोडणार असल्याचे समजते. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारलोकसभा