Join us

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 5:50 PM

भाजपच्या बैठकीत निवडणुकीतील अपयशाची कारणमीमांसा करताना देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीतही भाजप कसा नंबर एकचा पक्ष ठरला आहे, हे सांगितलं आहे.

Maharashtra Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर चिंतन करण्यासाठी भाजपच्या विधीमंडळ गटाची आज मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अपयशाची कारणमीमांसा करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीतही भाजप महाराष्ट्रात कसा नंबर एकचा पक्ष ठरला आहे, हे सांगत आपल्या पक्षाच्या आमदारांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगताना फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं.

आमदारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या आहेत, तर ते विधानसभा मतदारसंघांमध्येही प्रतिबिंबित व्हायला हवं होतं. मात्र महायुतीला १३० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. भाजपला ७१ जागांवर आघाडी आणि आपल्यासोबतचे इतर नेते मिळून एकूण ७६ विधानसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे. मतदानाच्या टक्केवारीचा विचार करा, विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळालेल्या आघाडीचा विचार करा, असा कोणताही निकष लावला तरी लोकांनी आपल्याला सहकार्य केलं आहे. त्यामुळे लोकसभेच्या आपल्याला नऊ जागा मिळालेल्या असल्या तरी सर्वार्धाने आपण महाराष्ट्रात नंबर वन आहोत," असा दावा फडणवीस यांनी केला. 

महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी कानमंत्र

"लोकसभा निवडणूक निकालानंतर आता महायुतीतील पक्षांनी एकमेकांवर भाष्य करणं टाळलं पाहिजे. आपण ताकदीने आगामी निवडणुकीला सामोरे गेलो तर मोठा विजय मिळवू शकतो. लोकसभा निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या मतांमध्ये आणखी ३ टक्क्यांची वाढ करायची गरज आहे. आपली तेवढी ताकद नक्कीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने ताकदीने मैदानात उतरू आणि मैदानात फत्ते करून दाखवू," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकाल