शेतकरी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:31 PM2020-02-24T12:31:39+5:302020-02-24T12:35:58+5:30
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला.
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
आज पहिल्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गेल्या काही दिवसांत राज्यात वाढलेल्या महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांवरून सरकारला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. . दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या शोकप्रस्तावानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आजपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात आहे. महिला अत्याचार, शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे हल्ले परतवण्याची जोरदार तयारी सरकारने केली असून, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या रविवारी रात्री झालेल्या बैठकीत त्यासाठीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे.