Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. परंतु, या मोर्चात सहभागी होण्यासाठी पैसे वाटण्यात आले होते, असा मोठा आरोप केला जात आहे. याबाबतचा एक व्हिडिओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते यांनी मोठा खटाटोप केला. सगळ्यांनी एकत्र येऊन आपण राज्याच्या राजधानीत काहीतरी वेगळे करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष मोर्चात फार तुरळक गर्दी होती. ती आपण सगळ्यांनी पाहिली. तसेच पैसे वाटून तुरळक गर्दी आणली असेल तर ते नैतिकतेच्या गोष्टी कशाच्या आधारावर मारतात, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली.
मविआच्या महामोर्चात सामील होण्यासाठी पैसे वाटण्यात आले?
केशव उपाध्ये यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरचा असल्याचे सांगितले जात असून. या व्हिडिओत एक जण काही लोकांना पैसे वाटताना दिसत आहे. तसेच मागे महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे बॅनरही लागलेले दिसत आहेत. मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य. मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने…, असे कॅप्शन केशव उपाध्ये यांनी दिले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पैसे का वाटप केले जाते याचा अभ्यास केला पाहिजे. मोर्चाला जी काही लोकं आली होती ती असे पैसे वाटून आणली होती का? याचा खुलासा काँग्रेसने करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"