Join us

“सरकार असो वा सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा”; भाजपची जयंत पाटलांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 3:14 PM

महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.

मुंबई: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोध पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. यातच आता पनवेलमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेने मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी संबंधित असल्याचे समोर येत आहे. या एकूणच प्रकरणावरून भाजपने जयंत पाटील यांच्यावर टीका केली असून, सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र अन् हीच यांची घोषणा असल्याचे म्हटले आहे. 

जयंत पाटील रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सन २००४ मध्ये एका संस्थेला महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही जमीन देण्यात आली होती. त्यावर संस्थेने अजूनही महाविद्यालय उभारले नाही. मात्र, सरकारकडून मिळालेल्या १४ एकरपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेने तीसपट मोबदला मिळवल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जयंत पाटील यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. 

सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा

दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा, असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 

दरम्यान, ड्रग्स पार्टी प्रकरणावरुनही राजकारण चांगलेच तापले आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपवर जोरदार टीका केली होती. मलिकांच्या या टीकेला केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भाजपवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला होता. 

टॅग्स :राजकारणभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसजयंत पाटील