Join us  

“ठाकरे सरकारला केंद्र द्वेषाची कावीळ, काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 1:36 PM

भाजपला काश्मिरी पंडित शिव्याशाप देत असून, ५६ इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवलाय, असे शिवसेनेने म्हटले होते. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: आताच्या घडीला काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandits) होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या वाढत्या प्रकरणांवरून काश्मीर खोऱ्यात तणावाची स्थिती असून, शेकडो काश्मिरी पंडितांनी याचा धसका घेत स्थलांतर केले आहे. यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. शिवसेनेनेही काश्मिरी पंडितांच्या हत्यांवरून भाजपवर घणाघाती टीका केली असून, याला भाजपने त्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे. 

काश्मिरी पंडितांवरील हल्लासत्रावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रामध्ये सत्तेत असणारे मोदी सरकार आठ वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत असतानाच दुसरीकडे काश्मीरमध्ये हिंदू पंडितांच्या रक्ताचे पाट वाहत असल्याचं सांगत शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका केली आहे. भाजपला काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरुन शिव्याशाप देत असल्याचा दावा करताना शिवसेनेने काश्मिरी पंडितांच्या मदतीसाठी महाराष्ट्र पुढे सरसावला असून, त्यांना मदत करण्याची घोषणा करत, ५६ इंच छातीचा दिलदारपणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दाखवलाय, असे म्हटले आहे. याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्युत्तर दिले आहे. 

राष्ट्रीय प्रश्नावर बोलण्याऐवजी आपल्या अंगणात काय जळतेय ते पाहायला हवे!

आपल्या घरासमोर पहारा देण्यासाठी तहानभूक विसरून उन्हात बसलेल्या वृद्ध शिवसैनिक महिलेला जो मुख्यमंत्री घर देऊ शकत नाही, तिच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी देऊ शकत नाही आणि महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणतीही योजना न आखता केवळ केंद्राकडे बोटे दाखवण्याचे राजकारण करतो, जो मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या न सोडविता भ्रष्टाचार आणि दहशतवादाची पाठराखण करतो, त्यानी अगोदर राष्ट्रीय प्रश्नावर बोलण्याऐवजी आपल्या अंगणात काय जळतय ते पहायला हवे!, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले

राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असताना व शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असताना मुख्यमंत्री मात्र जनतेची जबाबदारी झटकून टाकत होते. या परिस्थितीला मी जबाबदार आहे असे प्रत्येक नागरिकास वाटावे, असे फासे धूर्तपणे टाकून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडले आणि आता काश्मीरसारखा राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नात नाक खुपसून राज्याचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल, अशी ग्वाही केशव उपाध्ये यांनी दी.

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्यांवरून जनतेचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न

काश्मिरी पंडितांच्या कळवळ्याचे राजकारण सुरू करून केंद्र सरकारच्या द्वेषाची कावीळ झालेल्या ठाकरे सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील समस्यांवरून जनतेचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या अडीच वर्षांत असंख्य समस्यांनी महाराष्ट्राला घेरले. कोरोना महामारीत हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना सत्ताधारी शिवसेनेतील प्यादी आपल्या मातोश्रीवर कोटी रुपयांची खैरात करत होती. मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता हडप करण्याची कारस्थाने सुरू होती. काही मंत्री पोलिसांना हाताशी धरून खंडणी वसुलीच्या कामाला लागले होते. दहशतवादी व देशद्रोही कारवायांसाठी हातभार लावण्याचा कट सरकारमध्येच शिजत होता, आणि सामान्य माणसे मात्र माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा हतबल अवस्थेत संकटाशी सामना करत होती, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. 

टॅग्स :जम्मू-काश्मीरशिवसेनाभाजपा