Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 02:18 PM2021-12-15T14:18:30+5:302021-12-15T14:19:26+5:30

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

bjp keshav upadhye slams maha vikas aghadi thackeray govt over omicron variant situation in state | Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

Next

मुंबई: कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron Variant) विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून, देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जनतेशी दूरसंवाद साधणारे मुख्यमंत्री ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन सरकारी कामकाजापासून दूर असल्याने सरकारमध्ये सावळा गोंधळ माजला असून, पुन्हा एकदा जनतेच्या सुरक्षेचा मुद्दा वाऱ्यावर पडला आहे, असे ते म्हणाले.

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतरही राज्याच्या कोरोना टास्क फोर्सकडून कोणत्याच उपाययोजनांची माहिती जनतेस दिली गेली नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे हेदेखील या नव्या फैलावासंदर्भात मौन धारण करून बसले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुख्यमंत्री ठाकरे स्वतः समाजमाध्यमांद्वारे तरी जनतेस मार्गदर्शन करत होते. पण आता मात्र राज्याच्या मंत्रिमडळात मनमानी कारभाराची स्पर्धा सुरू आहे, या शब्दांत केशव उपाध्ये यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला. 

उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सरकारी पदांच्या परीक्षांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर येत आहेत. एसटी कामगारांच्या संपाचा गुंता सोडविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, आणि सत्तेवरील पक्ष मात्र, राजकारणात रमले आहेत. कोरोनाकाळातील आरोग्य यंत्रणेच्या असंख्य त्रुटींमुळे मृत्युसंख्या वाढली होती. उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, उपचार केंद्रांतील भ्रष्टाचार, औषध खरेदीतील उधळपट्टी अशा अनेक तक्रारींमुळे कोरोनाच्या उद्रेकात राज्यात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झालेली असताना, नव्या घातक ओमिक्रॉनच्या वाढत्या फैलावाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला असून, जनता वाऱ्यावर पडली आहे. नव्या विषाणूचे संकट वाढत असताना, तातडीने उपाययोजना आखणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र, फैलाव वाढत असतानाही सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्याबद्दल उपाध्ये यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचा धाक राहिलेला नसल्यानेच मंत्रिमंडळाची मनमानी सुरू असून त्याचा फटका जनतेस बसत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सरकारने ओमायक्रॉनचा फैलाव रोखण्याच्या ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात, असी मागणीही उपाध्ये यांनी केली. 

दरम्यान, या नव्या ओमायक्रॉन संकटात टाळेबंदीसारख्या उपाययोजना पुन्हा जारी होतील का, याबद्दलही जनतेच्या मनात भीती आहे. तसे झाल्यास रोजगाराच्या समस्या पुन्हा उग्र होतील या चिंतेने जनतेस ग्रासले आहे. जनतेच्या अशा शंकांचे निरसन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीतून तरी पार पाडत होते. आता मात्र, सरकार पुरते गोंधळल्याने जनतेस वाली राहिलेला नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीस लवकर आराम पडावा व त्यांनी भरकटलेल्या सरकारला रुळावर आणून जनतेस दिलासा द्यावा अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
 

Web Title: bjp keshav upadhye slams maha vikas aghadi thackeray govt over omicron variant situation in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.