Join us

Rajya Sabha Election 2022: “अडीच वर्षातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा पराभव, आमदारांना कोंडूनही मते भाजपला”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:31 AM

Rajya Sabha Election 2022: संजय राऊतांचे कौशल्य पाहा. संभाजीराजेंना अपमानित केले आणि मावळ्याचा पराभव केला, अशी टीका भाजपने केली आहे.

मुंबई: राज्यसभेच्या अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपच्या पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अडीच वर्षातील सर्व निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. तसेच हॉटेलमध्ये कोंडूनही मते भाजपला दिली, असा टोला लगावण्यात आला आहे. 

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. बाकी संजय राऊत यांचं कौशल्य पाहा. संभाजी महाराजांना अपमानित केलं आणि मावळ्याचा पराभव केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण गेल्या अडीच वर्षात निवडणूक कोणतीही असो सतत पराभूत होणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना, अशी बोचरी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमतासमोर प्रश्नचिन्ह

भाजपाचे आमदार आहेत १०६ पण भाजपाला पहिल्या पसंतीचे मते मिळाली १२४. उद्धव ठाकरे सरकारच्या बहुमतासमोर प्रश्नचिन्ह. कारण आमदारांना हॅाटेलमध्ये कोंडूनसुध्दा त्यांनी मत भाजपला दिली. ही फक्त अपक्षांची व छोट्या पक्षांची आहेत, या भ्रमात कुणी असेल तर त्याला नमस्कार, असा चिमटाही केशव उपाध्ये यांनी काढला. तसेच राज्यसभा निवडणूकीतील भाजपच्या विजयाने उद्धव ठाकरे सरकारवर त्यांचे आमदारही नाराज आहेत हे स्पष्ट झाले. देवेंद्र फडणवीस यांची रणनीती आणि त्यांच्यावर असलेला जनतेचा व आमदारांचा विश्वास यातून हा विजय साकार झाला, असे केशव उपाध्ये यांनी नमूद केले. 

दरम्यान, संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लगाल्यानंतरही विचारल तर शरद पवार म्हणतील लागले नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावे की काही लागले नाही, असा खोचक टोला भाजपचे विजयी उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांशी आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? अशी विचारणा अनिल बोंडे यांनी केली.  

टॅग्स :राज्यसभाभाजपामहाविकास आघाडी