मुंबई - म्हाडाच्या (MHADA) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत माहिती दिली आहे. "काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि इतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहेत. ऐन वेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची जी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षा देण्यासाठी सेंटरवर जाऊ नये, गाव सोडू नये" असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. यावरून आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.
"विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा; हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती आहे. "या सर्व परीक्षा गोंधळाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन झालेच पाहिजे.विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा" असं म्हटलं आहे. तसेच तरुण - तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"आधी MPSC चा गोंधळ. मग आरोग्य सेवा भरती परीक्षेचा गदारोळ. आदल्या दिवशी परीक्षा रद्द केली. आता तर गृहनिर्माणमंत्र्यांनी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द केली. तरुण - तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार..." असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी "म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"म्हाडाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या"; जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
"माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही" असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच "ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हांला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही" असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दलाली करणाऱ्यांना दिला आहे.