Join us  

Keshav Upadhye : "सरकारचाच फ्यूज उडालाय; राज्यकारभाराची अवस्था ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झालीय" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:34 PM

BJP Keshav Upadhye And Thackeray Government : भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी विजेचं संकट आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे जनतेला त्रासाला सामोरं जावं लागत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची कामं खोळंबत आहेत. याचाच अनुभव राज्याच्या मंत्रिमंडळालादेखील आला. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अडचण निर्माण झाली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वाची चर्चा सुरू होती. नेमकी याचवेळी लाईट गेली. त्यामुळे बैठकीचा खोळंबा झाला. यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. 

भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. "खरंतर या सरकारचाच फ्यूज उडाला आहे. राज्यकारभाराची अवस्था वारंवार ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झाली आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान लाईट गेल्याने बैठकीत ई-उपस्थिती लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर या सरकारचाच फ्यूज उडाला आहे. राज्यकारभाराची अवस्था वारंवार ट्रिप होणाऱ्या ट्रान्सफॉर्मरसारखी झाली आहे."

"मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाईट जाणं ही सामान्य बाब म्हटली पाहिजे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाल्याने लोडशेडिंगमुळे राज्यातील लोकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव मंत्र्यांना होईल, ही अपेक्षा बाळगायची का? या प्रकारामुळे सरकारच्या डोक्यात काही प्रकाश पडेल का? हा प्रश्नच आहे" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्यांनी सरकारचाच_फ्यूज_उडालाय असा हॅशटॅग देखील वापरला आहे. याआधी देखील केशव उपाध्ये यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे ओबीसी आरक्षणावर बोलत असताना मंत्रिमंडळ बैठक सुरू असलेल्या दालनातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुख्यमंत्री डिसकनेक्ट झाले. वीज पुरवठाच खंडित झाल्यानं मुख्यमंत्र्यांना आपलं म्हणणं पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर सुरू असलेली चर्चा अर्धवट राहिली. वीज पुरवठा कोणत्या कारणामुळे खंडित झाला, ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  

टॅग्स :भाजपाराजकारण