मुंबई: महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव (Yashwant Jadhav) आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. यशवंत जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीयांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. यातून महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक डायरी प्राप्त झाली असून, यामध्ये अनेक संशयास्पद नोंदी सापडल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली असून, वांद्रे येथील‘मातोश्री’ला वाचवण्यासाठी आपल्या आईचे नाव घेतले, असा खळबळजनक दावा करण्यात आली आहे.
प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली असून, यामध्ये एक डायरी मिळाली आहे. या डायरीत, ५० लाखांचे घड्याळ दिले असून, गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू मातोश्रीला दिल्याची नोंद आढळून आल्याचा दावा करण्यात येत आहे. यानंतर भाजप नेत्यांनी यशवंत जाधव आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.
वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे
हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. तसेच यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. यामुळे असा काही व्यवहार झाला आहे का, याचा तपास आता केला जात आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी सदर दावे फेटाळले असून, आपल्या आईला या महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्याचे म्हटले आहे. आईच्या वाढदिवसाला घड्याळ भेट दिले होते, तर गुढीपाडव्याला आईच्या नावाने २ कोटी रुपयांच्या भेटवस्तू वाटल्या होत्या, असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. या संशयास्पद नोंदींशिवाय, न्यूजहॉक मल्टिमिडिया कंपनीशी अनेकविध प्रकारचे संशयास्पद व्यवहार झाल्याचेही आढळून आले आहे.