Mumbai North East Lok Sabha Result 2024: मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला आहे. संजय दिना पाटील यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा २९ हजार १५ मतांनी पराभव केला आहे. पहिल्या फेरीपासून ते तेराव्या फेरीपर्यंत संजय दिना पाटील यांनी ३० हजार मतांची आघाडी घेतली होती. असं असूनही आपणच जिंकणार असल्याचे भाजपचे कोटेचा यांचे म्हणणं होतं. मात्र १४व्या फेरीनंतर कोटेचा यांना आपला पराभव दिसू लागला. त्यानंतर पाटील यांनी मोठी आघाडी घेताच कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला. त्यानंतर संजय दिना पाटील यांच्या विजयाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. मात्र आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय पाटील आणि मिहीर कोटेच्या यांना मिळालेल्या मतांचे विश्लेषण करत धक्कादायक दावा केला आहे.
मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील निवडणूक ही सुरुवातीपासूनच भाषिक आणि धार्मिक वळणार लढली गेली. या मतदारसंघात मराठी- गुजराती भाषिक आणि हिंदू-मुस्लिम या धार्मिक वादातून मतांचे ध्रुवीकरण होणार असल्याचे सुरुवातीपासून म्हटलं जात होतं. शेवटी संजय दिना पाटील यांना एका मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाल्याने त्यांना विजय मिळाला. संजय दिना पाटील यांना एकूण ४ लाख ४८ हजार ६०४ मतं मिळाली. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना ४ लाख १९ हजार ५८९ मतं पडली. यावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आम्ही बांगलादेशींमुळे हरलो असं म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांनी एक्स सोशल मिडिया हँडलवर आकडेवारी पोस्ट करत धक्कादायक दावा केला. तथ्य. वस्तुस्थितीनुसार मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून भाजपचे मिहिर कोटेचा २९,८६१ मतांनी पराभूत झाले. मानखुर्दमध्ये ८७,९७१ मतांनी त्यांचा पराभव झाला. मुलुंड ते घाटकोपर मतदारसंघात ५८,११० मतांची वाढ झाली. मानखुर्द (बांगलादेशी क्षेत्र) मध्ये फक्त एक विधानसभेत उद्धव ठाकरे सेनेला १,१६,०७२ तर भाजपला २८,१०१ मते मिळाली. मिहिर कोटेचा ८७,९७१ मतांनी पराभूत झाले. आम्ही बांगलादेशींमुळे हरलो, असे किरीट सोमय्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
किरीट सोमय्या यांनी संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांना मतदारसंघनिहाय मिळालेली आकडेवारी दिली आहे. मुलुंड विधानसभा क्षेत्रात मिहीर कोटेचा यांना ११,६४,२१ तर संजय पाटील यांना ५५,९७९ मते मिळाली. विक्रोळीत कोटेचा यांना ५२,८०७ तर पाटील यांना ६८,६७२ मते मिळाली. भांडुपमध्ये कोटेचा यांना ७५,६५९ तर पाटील यांना ७९,११७ मते मिळाली. घाटकोपर पश्चिमध्ये कोटेचा यांना ६३, ३७० तर पाटील यांना ७९,१४२ मते मिळाली. घाटकोपर पूर्वमध्ये कोटेचा यांना ८३,२३१ तर पाटील यांना ४९,६२२ मते मिळाली. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोटेचा यांना २८,१०१ तर संजय पाटील यांना १,१६,०७२ मते मिळाली.