Join us  

Kirit Somaiya: “९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 4:40 PM

Kirit Somaiya: संपूर्ण सोमय्या कुटुंबीय चौकशीला सामोरे जायला तयार असून, महाराष्ट्राच्या सेवेत हजर असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई: आयएनएस विक्रांतच्या कथित घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असताना किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांवर सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली ५७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

नील सोमय्याही चौकशीला हजर होणार आहेत. खोट्या एफआयआर असल्याचे निरीक्षण नोंदवत कोर्टाने नीललाही संरक्षण दिले आहे. तुमचे नेते संजय राऊत म्हणतात की, आता मेधा सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार. उद्धव ठाकरे, तुम्ही माझ्या आईला विसरलेले दिसत आहे. ९० वर्षांच्या माझ्या आईने सांगितले आहे की, उद्धव ठाकरेंना निरोप द्या की माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल करा. सगळे सोमय्या चौकशीला सामोरे जायला तयार आहेत, या शब्दांत किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त केला. 

उद्धट सरकारला आव्हान देतो, १३ दिवस चौकशी करा

उद्धव ठाकरेंच्या उद्धट सरकारला आव्हान देतो. तुम्ही माझी १३ तास काय, १३ दिवस चौकशी करा. उद्धव ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांच्या घोटाळ्याचे तेरावे किरीट सोमय्या करूनच थांबणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. उद्धव ठाकरे, त्यांचा परिवार आणि सरकार फक्त घोटाळे करत आहे. सोमय्या परिवार महाराष्ट्राच्या सेवेत हजर आहे. एवढा उद्धटपणा महाराष्ट्राची जनता पहिल्यांदा पाहात आहे. माफियांचे महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संजय राऊत, तुमच्यात हिंमत होती, तर ५७ कोटींची एफआयआर का नाही केली? ७५०० कोटी अमित शाह यांना दिले, याची एफआयआर का नाही केली? नील सोमय्याच्या बोगस कंपनीवर का एफआयआर केली नाही? माफिया सरकारचा उपोग करून तुम्हाला काय वाटतं, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दाबू शकणार का? मी संजय राऊतांना चॅलेंज करतो, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.  

टॅग्स :किरीट सोमय्यामहाविकास आघाडीउद्धव ठाकरेसंजय राऊत