मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या सरकारी निवासस्थानी जवळपास १३ ते १४ तास चौकशी केली. याशिवाय दापोली येथील रेसॉर्टवरही तपास पथक धडकले होते. यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब आणि उद्धव ठाकरेंना चोरी, लबाडी, फसवणूक, गुंडगिरी, माफियागिरी केल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळेल, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.
किरीट सोमय्या पत्रकारांशी बोलत होते. अनिल परब यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ते नाटक पुन्हा करायचे ठरले तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिले. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचे म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरे का दिली जात नाहीत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात
१७ डिसेंबर २०२० ची पावती माझ्याकडे आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि अनिल परब परिवहनमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून भरला होता. याआधीही अनिल परब यांनी सर्व कर भरले होते. रिसॉर्ट सदानंद कदम यांचा आहे तर तुम्ही का कर भरत होतात, अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी केली. तसेच ही संपत्ती अनिल परब यांच्या नावे आहे. याचा बाजारभाव २५ कोटी रुपये आहे. आणि अनिल परब माझा रिसॉर्टशी संबंध नाही सांगतात, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केले. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवले असे सांगतात, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.