Join us  

'उद्धव ठाकरे खयाली पुलाव पकवत राहिले, अन्...'; अमित शाह यांनी सांगितला २०१४चा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 3:40 PM

स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले.

मुंबई- मुंबईतील गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह यांनी मुंबईत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, असं अमित शाह म्हणाले. 

भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. राजकारणात काहीही करा, पण धोका सहन करु नका. जे दगा देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर, नेते देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. त्यानंतर तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे, असं विधानही अमित शाह यांनी केलं आहे. 

उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली. असा गौप्यस्फोटही अमित शाह यांनी केला. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील, असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असं अमित शाह यांनी सांगितले. स्वत:च्या चुकीमुळेच शिवसेना फुटली, स्वत:च्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला, असं अमित शाह यावेळी म्हणाले. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण तापणार असल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, सामना अग्रलेखातून भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख केल्यानंतर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी आम्ही तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? असा चिमटा शेलारांनी काढला होता. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर देत सांगितले की, शिवसेना कुठली सेना हे निवडणुकीच्या मैदानात दिसेल. महाराष्ट्र विरोधक असो वा आशिष शेलारांना शिवसेना काय आहे ते स्पष्ट दिसेल असं म्हटलं आहे. 

टॅग्स :अमित शाहउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा