मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ८१ वा वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले.
अमोल कोल्हे भाषणात म्हणाले की, देशातील कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भुज भूकंपावेळी शरद पवार यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील वाहवा केली होती, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी यावेळी करुन दिली. तसेच जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
अमोल कोल्हे यांच्या या विधानानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे. निलेश राणे म्हणाले की, शरद पवार हे राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही, असं निलेश राणे म्हणाले. तसेच शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे, त्यात पण पूर्ण १००% टक्के नाही. दिल्लीमध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राचे सोडून १०० कार्यकर्ते दाखवावे, असा टोला देखील निलेश राणे यांनी लगावला आहे.
दरम्यान, शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तसेच शरद पवार हे गेली ४० वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला.
२०२४ नाही, त्यापुढचा विचार करा- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
विचारांची लढाई उभी करायची असेल, तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, २०२४ चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.