'एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शेवटी शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलचं'; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 06:14 PM2022-10-24T18:14:46+5:302022-10-24T18:19:01+5:30
भाजपाचे नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुंबई- सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. ऐन हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, मका, बाजरी आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि पीक नुकसानाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते.
संकटं येत असतात, परंतु त्यांच्याशी आपल्याला लढायचे आहे. तुमचे नुकसान झालेले असले तरी तुम्ही धीर सोडू नका, आपण सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले. जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच यावेळी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला इशारा देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याचदरम्यान भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांनी अखेर उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलं. किमान या निमित्ताने तरी ते मातोश्रीबाहेर पडले, असा खोचक टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांवर ज्या आपत्ती येतात त्या दोन प्रकारच्या असतात, एक कोरडा दुष्काळ असतो तर एक अतिवृष्टीची आपत्ती असते. हे आपल्या हातात नसते परंतु ही अस्मानी संकटे आल्यानंतर सरकारचे कर्तव्य असते की, शेतकऱ्याला उघड्यावर पडू द्यायचे नाही. त्याचे घरदार उघड्यावर पडता कामा नये. माझी भेट ही प्रतिकात्मक आहे. एका विचित्र अवस्थेत आपण सर्वजण आहोत. एकाबाजूला दिवाळी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे दिवाळे निघालेले आहे. दिवळी साजरी तर सोडून द्या पण दिवाळीत कपडे कोणते घालायचे, घरात अन्न काय शिवजवायचे? हा मोठा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बळीराजाशी गद्दारी करु नका- उद्धव ठाकरे
आमच्या काळात एनडीआरएफचे निकष बदलले होते. त्यावेळी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी बसून संवाद साधला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसेल, तर आम्ही त्यांना भाग पाडू. आमच्याशी सत्तेसाठी गद्दारी केली पण बळीराजाशी गद्दारी करु नका. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडू. प्रसंगी मी स्वत: रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.