Rajya Sabha Election 2022: “जोर का झटका धीरेसे... आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार”: अनिल बोंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:03 AM2022-06-11T11:03:34+5:302022-06-11T11:04:29+5:30
Rajya Sabha Election 2022: संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी, असा खोचक टोला अनिल बोंडे यांनी लगावला.
मुंबई: राज्यसभेच्या अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपकडून उमेदवारी मिळालेले डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयानंतर अनिल बोंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊत यांनी विजयाची व्याख्या पुन्हा करावी. खरे पाहिले तर संजय राऊत आणि शिवसेना यांचा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय झाला होता, तो त्यांचा विजय नव्हताच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील हे सांगून त्यांनी आपले उमेदवार निवडणूक आणले होते. नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांनी सरकार स्थापन केले. यावेळी कोणासोबतही युती न करता आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले. त्यामुळे राऊत यांनी विजयाची व्याख्या समजून घ्यावी, या शब्दांत अनिल बोंडे यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधला.
आता विधान परिषदेतही धक्क्यावर धक्के बसणार
यालाच म्हणतात जोर का झटका धीरेसे लगे. धक्का लगाल्यानंतरही विचारल तर शरद पवार म्हणतील लागले नाही. ही तर पहिलीच वेळ आहे. पुढे वीस तारीख आहे. त्याच्यानंतरही पुढचा काळ आहे. त्यांना धक्क्यावर धक्के सहन करावेच लागणार आहे. तेव्हादेखील त्यांनी म्हणावे की काही लागले नाही, असा खोचक टोला अनिल बोंडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही. मुख्यमंत्र्यांशी आज कोणता आमदार भेटू शकतो? मंत्रीतरी भेटू शकतो का? अशी विचारणा अनिल बोंडे यांनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा सांगितले आहे की, हे सरकार कधी पडेल याचा मुहूर्त सांगू नये. हे सरकार आपापसातील कलहाने पडेल. जनतेला हे सरकार डोईजड झाले आहे. आमदार विटलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सद्सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले होते. किती दिवस अपक्ष आमदार किंवा लहान पक्ष अन्याय सहन करणार, असेही ते यावेळी म्हणाले.