’’देर आए, दुरुस्त आए’’; पुरग्रस्त भागाच्या दौऱ्यावरून आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2020 12:57 PM2020-10-19T12:57:57+5:302020-10-19T13:29:08+5:30
Ashish Shelar News : उद्धव ठाकरे यांच्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे
मुंबई - परतीचा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील काही भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या पाहणी दौऱ्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी देर आए, दुरुस्त आए, असा टोला मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री बॉलिवूडमधून बाहेर पडून बांधावर गेल्याने शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे. तसेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही
अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे, जनावरांना चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे वैगेरे या भानगडीत न पडता तात्काळ मदत केली पाहिजे, जनावारांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊलं उचलावी, अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखून तात्काळ मदत केली पाहिजे, मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली, केंद्र सरकारचं पथक येईल, नुकसान भरपाईचा आढावा घेईल, राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, केंद्र सरकार मदत करणार आहे, पण तोपर्यंत राज्य सरकारने मदत करायला हवी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.