"बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!", आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 02:43 PM2022-02-05T14:43:22+5:302022-02-05T14:43:55+5:30

Ashish Shelar : भाजपच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिले आहे.

BJP Leader Ashish Shelar challenge to Shiv Sena on BMC Elections 2022 | "बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!", आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान

"बदल व्हायलाच हवाय... लढाई आता सुरु!", आशिष शेलारांचे शिवसेनेला आव्हान

Next

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BMC Elections 2022) विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 25 समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. यामध्ये निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेला (Shiv Sena) आव्हान दिले आहे.

"गेली 25 वर्षे  मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय..बदल व्हायलाच हवाय..लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!!" असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. त्यात शिवसेनेने विजय मिळवला. यामुळे आता आशिष शेलारांच्या या टि्वटला शिवसेना आता काय उत्तर देणार, याकडे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्ष जबाबदार दिली आहे. या समितीत राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश मेहता, नितेश राणे हे सदस्य असणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2017 च्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला 80 च्या वर जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील भाजपने त्यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप आता आमने सामने ठाकले आहेत.

आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत दोन टर्म नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. मुंबईतील राजकीय, सामाजिक समीकरणांची त्यांना चांगली माहिती आहे. शहराच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

2012 मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे 31  नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपची शिवसेनेसोबत युती होती. त्यानंतर 2017 मध्ये ही युती तुटली. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. आशिष शेलारांच्या नेतृत्त्वात भाजपचे 82 उमेदवार निवडून आले. भाजपने शिवसेनेला तुल्यबळ लढत दिली. शिवसेनेच्या 84 जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेने कशीबशी सत्ता राखली. मात्र भाजपने शिवसेनेला चांगलाच घाम फोडल्याचे या निवडणुकीत दिसून आले होते. त्यामुळे आगामी निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी पूनम महाजन
जाहीरनामा समितीच्या अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून माध्यम विभाग समिती अध्यक्ष पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची प्रशासन समन्वयपदी नेमणूक करण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी आणि आमदास विद्या ठाकूर यांच्याकडे विशेष संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला संपर्क समितीची जबाबदारी शलाका साळवी, शीतल गंभीर यांच्याकडे आहे. संजय पांडे यांच्याकडे प्रवाशी कार्यकर्ता समितीची जबाबदारी आहे. भाजप आमदार योगेश सागर हे जाहिरनामा समितीचे सचिव असतील. या समितीत भाजप नेते सुनिल राणे, आर.यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे हे सदस्य आहेत.

Web Title: BJP Leader Ashish Shelar challenge to Shiv Sena on BMC Elections 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.