'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 09:27 AM2024-05-21T09:27:34+5:302024-05-21T09:29:28+5:30
निवडणूक आयोगाच्या कामावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Ashish Shelar on Uddhav Thackeray : सोमवारी राज्यातील १३ मतदारसंघांसह मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. मुंबईतील सर्व लोकसभा मतदासंघांचा पाचव्या टप्प्याअंतर्गत समावेश होता. देशात पाचव्या टप्प्यात एकूण ४९ मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषतः मुंबईच्या अनेक भागात ईव्हीएम मशीन्स बंद पडल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान करताच माघारी फिरले. यावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर आता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबईमध्ये सोमवारी ३५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसत मतदान करावं लागलं. काही ठिकाणी तदारयादीतून नावे गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्यामुळे नागरिकांना दोन तासांपेक्षा अधिक वेळ रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे काही मतदार न करताच घरी परतले. दुसरीकडे मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, पंखे आदी सुविधांचा अभाव यामुळे मतदारांचे अतोनात हाल झाले. या सगळ्या घटनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई करण्यात आली. तसेच वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. निवडणूक आयोगाचे अधिकारी पक्षपातीपणे वागले असून आयोगाने मोदींच्या घरगड्यासारखे काम केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे.
"मतदान प्रक्रिया आज सुरू असतानाच उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही हेतू आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे," असे आशिष शेलार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मतदान प्रक्रिया आज सुरू असतानाच उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही हेतू आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी अशी… pic.twitter.com/T8y899cQW8
— ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) (@ShelarAshish) May 20, 2024
दरम्यान, मतदान केंद्रांवर जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. "मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. ४ जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.