मुंबईः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’मधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यभरात सुरू झाली. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग सर्वसामान्यांपासून ते अनेक राजकीय नेत्यांनाही झाल्याचे समोर आले आहे. आता भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. (bjp leader Ashish Shelar Corona Positive)
भाजपा नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलारांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी ५८ हजार ९५२ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३५ लाख ७८ हजार १६० वर गेला असून, बळींची संख्या ५८ हजार ८०४ झाली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने सहा लाखांचा टप्पा पार केला असून, सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.