Join us

'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

By जयदीप दाभोळकर | Published: January 05, 2021 3:20 PM

आशिष शेलरांनी करून दिली शिवसेनेला त्यांच्या आश्वासनाची आठवण

ठळक मुद्दे५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णत: माफ करण्याचा घेण्यात आला होता निर्णयतत्कालिन फडणवीस सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालं होतं शिक्कामोर्तब

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. तसंच सत्ताधाऱ्यांकडून यापूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांची आठवणही आता विरोधकांकडून करून देण्याचे प्रयत्न सुरू आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी "त्या बाणेदार वचनाचं काय झालं," असा सवाल करत शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचा निर्णय तत्कालिन फडणवीस सरकारच्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णत: माफ करावा आणि ५०१ ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी गाळ्यांना ६० टक्के सवलत मालमत्ता करात द्यावी, असा ठराव मुंबई महापालिकेने ६ जुलै २०१७ रोजी केला होता. तसा प्रस्ताव शासनास सादरदेखील करण्यात आला होता. त्यातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हवेतच विरला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी यावरूनच शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात. मग, मुंबईकरांना ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे  जे 'बाणेदार वचन' दिलं त्याचं काय झालं? टाटा, जावई, मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या," असं म्हणत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

टॅग्स :मुंबईभाजपाशिवसेनाआशीष शेलारउद्धव ठाकरे