मुंबई- राष्ट्रीय सेवा दल, राजद, जनता दल युनायटेड यांच्यासह २१ समाजवादी पक्ष आणि संघटनांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
... तर दिल्लीतील सरकार टिकणार नाही; वळसे पाटलांनी सांगितलं आरक्षणाचं राजकारण
आमदार आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं...? शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं! श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले, अशी टीका केली आहे.
ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे, 'राम मंदिरावर टीका करुन दाखवली, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवले, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं, असंही म्हटले आहे.
"गर्व से कहो हम हिंदू हैं" म्हणणारी शिवसेना आता."गर्व से कहों हम समाजवादी हैं" म्हणू लागली..! भविष्यात कदाचित "गर्व से कहो हम MIM हैं" सुध्दा म्हणू लागतील, असंही पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती
शिवसेना (उद्धव ठाकरे) गट आणि समाजवादी जनता परिवाराशी युती केली आहे, अशी घोषणा काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये समाजवादी जनता परिवार आणि ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये संयुक्त बैठक पार पडली. समाजवादी परिवारातील विविध संघटनेतील सदस्यांनी यावेळी ठाकरे गटाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती.