‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं?; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:48 AM2024-01-10T11:48:49+5:302024-01-10T11:49:38+5:30
आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू असं शेलारांनी म्हटलं आहे.
मुंबई - शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल सुनावणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नार्वेकरांचा निकाल हा मॅच फिक्सिंग असणार अशी टीका केली जात आहे. त्यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी निशाणा साधला आहे. ‘मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं? अशा शब्दात शेलारांनी उद्धव ठाकरेंचा चिमटा काढला आहे.
आशिष शेलारांनी ट्विट करून म्हटलंय की, आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते. नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू, जुगाड करुन मुख्यमंत्रीपद मिळविले, तरीही रडगाणे सुरूच, पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते. पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणे कायम होते. मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हाही रडणे सुरूच...बरं, भाजपाने देशातील अनेक राज्यं जिंकली तेव्हाही रडतच होते. राम मंदिर उभे राहिले, मग निमंत्रण नाही म्हणून रडायला लागले. कुठल्याही निवडणुका लागल्या की, झाली यांची रडायला सुरुवात असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा त्यांच्या बाजूने आला, तेव्हाही रडणे सुरुच होते आणि आज..विधानसभा अध्यक्ष निवाडा देणार असे कळले, तेव्हापासून तर पत्रकार पोपटलाल यांच्यासह प्रत्येकजणाने वेगवेगळे सूर लावून रडायला सुरुवात केली आहे. मर्द आहे’ असं म्हणायचं आणि सतत रडत बसायचं? छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। मन हारकर, मैदान नहीं जीते जाते ही अटल बिहारी वाजपेयींची कविता पोस्ट करून शेलारांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
◆आमच्या सोबत सत्तेत होते तेव्हा रडत होते
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 10, 2024
◆नंतर मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून रडणे सुरू
◆जुगाड करुन मुख्यमंत्रीपद मिळविले, तरीही रडगाणे सुरूच
◆पक्षप्रमुख होते तेव्हाही आमच्या नावाने रडत होते
◆पक्ष उभा फुटला तेव्हाही रडणे कायम होते
◆मुख्यमंत्रीपद गेले, तेव्हाही रडणे सुरूच...…
काय म्हणाले संजय राऊत?
जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडत आहे. त्याच्यावर चर्चा होत आहे. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत, त्यांच्यामुळे देशाचे आणि महाराष्ट्राचे संविधान पायदळी तुडवले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा यांनी सुनावणी देण्यास चालढकल केली. त्यांनी कामांमध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या. जे न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत, ते तटस्थ राहिले पाहिजे. आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे. निर्णय दिल्लीतून झालेला आहे. फक्त शिक्का मारणे बाकी आहे. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, एवढा आत्मविश्वास कुठून आला? म्हणजे निर्णय झाला आहे असा दावा संजय राऊतांनी केला.